सॅल्युट इंडिया उपक्रम

आपल्या देशाच्या सीमांचे प्राण पणाला लावून रक्षण करणाऱ्या ; महापूर, वादळे, भूकंप या सारखे निसर्ग प्रकोप, अंतर्गत दंगली, दहशतवादी हल्ले या अशा आपत्तींमध्ये प्रसंगी प्राणांचे बलिदान करून नागरिकांचे रक्षण करणाऱ्या आपल्या संरक्षण दलांतील वीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही तरी करायला हवे, या भावनेतून महाराष्ट्र सेवा संघाच्या कार्यकर्त्यांचे विचारमंथन झाले. आणि त्यातून “प्रेरणा पुरस्काराची” निर्मिती झाली.

दि. २५ डिसेंबर २०१५ रोजी, डी. शिवानंदन- माजी पोलीस महासंचालक ह्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून पहिला सोहळा साजरा झाला. या पुरस्काराचे मानकरी होते ग्रुप कॅप्टन दिलीप परुळकर, व्ही. एस. एम. निवृत्त कमांडर रवींद्र पाठक ( निवृत्त) आणि सुभेदार मेजर अशोक काशीद. या वीरांबरोबरच मान्यवर इतिहास संशोधक अप्पा परब यानाही संस्थेने सन्मानित केले.

प्रेरणा पुरस्कारापासून स्फूर्ती घेत पुढे भारतीय सैन्य दलातल्या जवान आणि अधिकाऱ्यांच्या व्यथा, त्यांच्या भारतीय जनतेकडून असणाऱ्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या समविचारी कार्यकर्त्यांचे एक अभियान निर्माण व्हावे असे संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या विचारमंथनातून ठरले. आणि त्यातूनच “सॅल्यूट इंडिया” या अभियानाची निर्मिती झाली. या माध्यमातूनच अनुराधा प्रभूदेसाई यांचा “कारगील वीरांचे” स्मरण करणारा वीरमित्र हा कार्यक्रम झाल्यावर ह्या उपक्रमाला आणिकच बळकटी आली. आणि ह्या जोरावर सॅल्यूटने सप्टेंबर २०१६ मध्ये भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचे दर्शन घडवणारे एक प्रदर्शन संस्थेच्या सभागृहात आयोजित केले. या प्रदर्शनाचे उद्घाटन भारतीय नौदलाच्या वेस्टर्न नेव्हल कमांडचे अधिकारी रिअर अॅडमिरल सतीश घोरमाडे यांनी केले. भारतीय नौदलातील युद्धनौका, विनाशिका, पाणबुड्या, विमानवाहू नौका यांच्या प्रतिकृती प्रदर्शनात होत्या. नौदलांचे अधिकारी प्रदर्शनात उपस्थित होते प्रदर्शनाचा समारोप अतिशय प्रतिष्ठित अशा नेव्हल बँडने झाला. प्रदर्शनाला विद्यार्थी आणि नागरिकांचा उदंड चांगला मिळाला.

दि. ४ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रेरणा पुरस्काराचा दुसरा सोहळा पार पडला. या वर्षीच्या पुरस्काराचे मानकरी होते कमांडर श्रीरंग बिजूर, लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील, निवृत्त अतिरिक्त पोलीस उपयुक्त शिरीष इनामदार आणि विंग कमांडर जान्हवी खानोलकर.

सॅल्यूट इंडिया उपक्रमाच्या तिसऱ्या वर्षात एका अतिशय भव्य अशा “वायुशक्ति” या भारतीय हवाईदलाचे सामर्थ्य उलगडून दाखवणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन कार्यकर्त्यांनी केले. प्रदर्शनात हवाईदलाची विविध मॉडेल्स, आयुधे, यंत्रणा इत्यादि तर होतेच पण अतिशय रोचक अशी ड्रोनची प्रात्याक्षिके, अनेक चित्रफिती, मान्यवरांची व्याख्याने, हवाईदलाचे करियर मार्गदर्शन दालन अशी विविधांगी आणि भरगच्च योजना होती. सोहळ्याची सांगता खास गुजरातमधून पाचारण केलेल्या हवाईदलाच्या बँड पथकाच्या सादरीकरणाने झाली. १३,००० व्यक्तींची उपस्थिती लाभलेल्या या भव्य आणि देखण्या प्रदर्शनाने प्रभावित होऊन हवाईदलाच्या मुंबई कार्यालयाचे प्रमुख फर्नांडिस (ए. व्ही. एम. ) ह्यांनी उत्तम आयोजनाकरता संस्थेला लेखी प्रशस्तीपत्र दिले. प्रदर्शनाची व्याप्ती लक्षात घेऊन ते “रावसाहेब बाळाराम ठाकूर” विद्यामंदिर संस्थेच्या प्रचंड प्रांगणात आयोजित केले होते.

तिसरा प्रेरणा पुरस्कार खडकी येथील पॅराप्लेजिक रिहाबिलिटेशन सेंटर मधील दोन सैनिकांना प्रदान करण्यात आला. आपले कर्तव्य बजावताना मेरूदंडाला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे कमरेखालचे अथवा सर्व शरीर संवेदनाहीन झालेल्या सैनिकांच्या पुनर्वसनासाठी ही संस्था काम करते.

लेफ्टनंट जनरल (निवृत्त ) विनायक पाटणकर यांचे काश्मीर समस्येवर झालेले व्याख्यान, काश्मीर प्रश्नाचा गुंता, तिथे सैन्य शांततेसाठी करत असलेले प्रयत्न, दहशतवादपेक्षा दहशतवाद्यांच्या उच्चाटनासाठी त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी चाललेल्या सामाजिक चळवळी यासंबंधी अतिशय समर्पक माहिती आणि दृष्टिकोन देणारे ठरले. पुण्याचे सारंग गोसावी या तरुणाने स्थापन केलेली “असीम फाऊंडेशन” ही संस्था तिथल्या तरुणांसाठी कसे वेगवेगळे उपक्रम राबवते आहे आणि हे असे उपायच समस्या निवारणासाठी कसे आवश्यक आहेत हे ऐकणे वेगळी दृष्टी देणारे होते.

२०१८ च्या दिवाळीत “लक्ष्य फाऊंडेशन”च्या सहकार्याने शारदा नीलायम संकुलात “एक सैनिक एक पणती” असा अभिनव कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मुलुंडमधले चार सैन्याधिकारी सहभागी झाले होते. या सर्वांना उपस्थितांनी मानवंदना दिली.

सॅल्यूट उपक्रमाचे एक मार्गदर्शक डॉ. सचिन पेंडसे यांचे जानेवारी २०१८ मध्ये निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ १९ जानेवारी २०१९ रोजी “भारतीय नौदलाची वैभवशाली ७० वर्षे” या विषयावर एक व्याख्यान आयोजित केले होते. व्याख्याते होते व्यासंगी अधिकारी कमांडर श्रीकांत केसनूर या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रेरणा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. डॉ. पेंडसे यांचे नौदलाशी असलेले अतूट नाते लक्षात घेऊन यंदाचा प्रेरणा पुरस्कार नौदल विशेष करण्यात आले. या पुरस्काराचे मानकरी होते युद्धनौकेवर काम केलेल्या पहिल्या महिला कमांडर (निवृत्त) राजेश्वरी कोरी. महिला अधिकाऱ्यांनी शिडाच्या नौकेने केलेल्या सागर परिक्रमा मोहिमेचा भाग असलेली लेफ्टनंट पायल गुप्ता आणि सागर परिक्रमेचे नवनवीन विक्रम ज्यांच्या नावे आहेत असे कमांडर अभिलाष टॉमी अशा या तीन जिगरबाज अधिकाऱ्यांचा प्रेरणा पुरस्काराने गौरव करण्यात आला. भविष्यात ही असे नवनवीन उपक्रम आयोजित करण्याचे कार्यकर्त्यांच्या मनात आहे.