भारतीय संस्कृतीची पाळेमुळे शोधताना संस्कृत भाषा व संस्कृत ग्रंथांचा अभ्यास अपरिहार्य आहे. कारण मानवी जीवनाशी निगडीत अनेक पैलू संस्कृत साहित्यात समर्थपणे मांडले गेले आहेत. महाराष्ट्र सेवा संघाचा संस्कृत विभाग विद्यार्थी व रसिकांमध्ये याची जाणीव निर्माण करून अभ्यासाच्या कक्षा रुंदावण्याचे कार्य गेली ३८ वर्षे अव्याहतपणे करत आहे.
इ.स.१९७७ मध्ये मृच्छकटिक नाटकातील एक प्रसंग सादर करण्याच्या निमित्ताने कै. राम बापट यांचे हस्ते संस्कृत कार्य सुरु झाले. १९८५ पासून मात्र ही धुरा पं. प्रभाकर भातखंडे यांनी आपल्या खांद्यावर पेलून धरली. ‘नाट्यम भिन्नारुचेजनस्य बहुधाप्यक समाराधनम’ या युक्तीप्रमाणे दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत संस्कृत नाटक सादर करता करता संस्कृत भाषेची गोडी कलाकारांच्या व रसिकांच्या मनात निर्माण झाली. त्यातूनच संस्कृत भाषा संवर्धनाचे विविध उपक्रम सुरु झाले.
१७ ऑगस्ट १९८५ पासून संस्कृत रसास्वाद वर्ग सुरु झाला. संस्कृत भाषेतील उत्तमोत्तम ग्रंथ संपदा मुलं व सामान्य रसिकांपर्यंत जावी आणि त्यातील सौंदर्याचा पुरेपूर आस्वाद घेता यावा यासाठी संस्कृत पं. प्रभाकर भातखंडे गेली ३० वर्षे अव्याहतपणे प्रयत्नशील आहेत. शब्दांच्या व्युत्पत्तीवर भर देऊन साहित्यातील मूळ अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न या वर्गात केला जातो. सुभाषिते, स्तोत्रे, वेद, व्याकरण, भक्तीवाड्मय, काव्य, इतिहास, नाटके, रामायण, महाभारत, जातक कथा, इ. अनेकविध विषयांचा या वर्गात अभ्यास करण्यात आला. पातंजल योगदर्शनासारखा गहन विषयही सर्वाना समजेल अशा पद्धतीने पं. भातखंडे यांनी शिकवला.
शाळा व महाविद्यालये वगळता संस्कृत भाषेच्या अध्ययनाची सोय कुठेही उपलब्ध नव्हती. संस्कृत भाषा संस्था, मुंबई या संस्थेने ‘केवळ ७२ तासात संस्कृत’ सारख्या आकर्षक पद्धतीने संस्कृत भाषा शिकवण्याचे वर्ग, त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. ग. वा. करंदीकर यांच्या सहाय्याने महाराष्ट्र सेवा संघाने अनेक वर्षे चालवले.
संस्कृत भाषेत संभाषण करता करता भाषा शिकता यावी यासाठी अनेक संस्कृत संभाषण शिबिरे संस्कृत विभागाने आयोजित केली आहेत. संस्कृत भाषेच्या विविध अंगांची रसिकांना व अभ्यासकांना ओळख व्हावी यासाठी अनेक विद्वान व मान्यवरांची व्याख्याने संस्कृत विभाग आयोजित करतो. वानगीदाखल सांगताना ‘यज्ञ व यज्ञाची पद्धत याविषयी जिज्ञासूंचे समाधान होईल असे डॉ. पातुस्कर यांचे व्याखान, डॉ. सीमा सोनटक्के यांचे ‘मेघदूतातील सौंदर्यस्थळे’ उलगडून दाखवणारे रंजक भाषण, पं. भातखंडे यांचे ‘गीता व योग यातील साम्यस्थळे’ यावरील विवेचन असे विविध विषय येथे रसिकांपर्यंत नेले आहेत.
महाराष्ट्र सेवा संघाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून २०११ पासून एक नवीन उपक्रम सुरु झाला, तो म्हणजे दरवर्षी एका तरुण संस्कृत विद्वानाचा सन्मान या पुरस्काराचे उदगाते कै. ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांनी हि जबाबदारी संस्कृत विभागाकडे सोपविली आहे. महावस्त्र, मानपत्र व रु. ५१०००/- असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आतापर्यंत डॉ. देवदत्त पाटील, डॉ. भाग्यलता पाटसकर, डॉ.मल्हार कुलकर्णी व वेदमूर्ती गणेश्वर सांब दिक्षित यांना सन्मानित करण्यात आले आहे
संस्कृत नाटक हा तर संस्कृत विभागाचा पायाच. १९७७ पासून शाकुंतल, मृच्छकटिक, रत्नावती, मुद्राराक्षस यासारखी नाटके सादर करता करता पं. भातखंडे यांनी स्वत: नाटयलेखनाला सुरुवात केली. १९८८ मध्ये त्यांनी लिहिलेल्या ‘वृक्षरक्षणम’ या नाटकापासून दरवर्षी नवीन नाटक राज्य नाट्य़स्पर्धेसाठी सादर केले जाते. करमणूकीतून काहीतरी संदेश समाजापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असून पर्यावरणरक्षण, रक्तदान यासारख्या नाटकाबरोबरच, प्रहसने (फार्स) बालनाट्ये, पुरुषपात्र विरहित नाटक, द्विपात्री द्धिपात्री नाटक इतकेच नव्हे तर तमाशा, असे सर्व प्रकार आम्ही यशस्वीपणे सादर केले आहेत. यासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिके, अनेक कलावंताना अभिनयाची पारितोषिके दिली आहेत आणि यांची आता गणना करणे थांबवावे लागले आहे!! यंदा २०१४-१५ च्या राज्य नाट्यस्पर्धेसाठी सादर झालेल्या ‘भगवदज्जुकीयम’ या नाटकासाठी दिग्दर्शनाचे द्वितीय तसेच अभिनयासाठी तीन कलाकारांना पारितोषिके प्राप्त झाली आहेत.
पं. प्रभाकर भातखंडे यांनी लिहिलेल्या नाटकांची ३ पुस्तके महाराष्ट्र सेवा संघाने प्रकाशितही केली आहेत. लोकप्रियतेमुळे या पुस्तकांची आवृत्ती काढावी लागली. त्यातील एक पुस्तक ‘मुक्त’ चा मुंबई विद्यापीठाने अभ्यासक्रमात समावेश केला आहे. संस्कृत रसिकांना व संस्कृत विषयक कार्य करणाऱ्या संस्थाना एकत्र येता यावे यासाठी दर दोन वर्षांनी संस्कृत संमेलन आयोजित करण्यात येते. याला मिळणारा भरघोस प्रतिसाद ही आम्ही योग्य दिशेने कार्य करीत असल्याची पावतीच मानवी लागेल.
संस्कृत विभागाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्र सेवा संघाचे विश्वस्त, पदाधिकारी व असंख्य स्वयंसेवी कार्यकर्ते यांचे मोलाचे योगदान आहे. संस्कृतप्रेमी रसिकांना अधिकाधिक संधी व सोयी उपलब्ध करण्यासाठी संस्कृत विभाग सदैव कार्यरत होता, आहे व असेल हाच आमचा प्रयत्न आहे.
श्री गुरुप्रसाद कार्लेकर(अध्यक्ष)
श्रीमती सुमेधा नवाथे(कार्यवाह)