(विज्ञान प्रेमींचा मंच)
विज्ञान कथाकार आणि साहित्यिक श्री. निरंजन घाटे ह्यांना जानेवारी २०१४ मध्ये सु. ल. गद्रे साहित्यिक पुरस्कार देण्यात आला. ह्या निमित्तानेच; अध्यक्ष श्री. चंद्रशेखर वझे ह्यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र सेवा संघाचा स्वतंत्र विज्ञान विभाग सुरु झाला आणि बघता बघता एका वर्षात विज्ञान विभागाने अनेक अनोखे कार्यक्रम सादर केले.
विज्ञान-तंत्रज्ञान हे आजच्या आयुष्याचा इतका अविभाज्य भाग झाला आहे की लहान थोरांना त्याच्या जाणीवपूर्वक वापरासाठी जितकं प्रबोधित करता येईल तितकं हवंच आहे. हा दृष्टीकोन ठेवून मूलभूत गणित-विज्ञानापासून अगदी रोजच्या वापरातील स्मार्ट फोन सारखे तंत्रज्ञानापर्यंतचे विषय ह्या विभागाने हाताळले आणि ह्यापुढेही सातत्याने वेगवेगळ्या स्वरूपात बहुस्पर्शी उपक्रम आणि कार्यक्रम राबवण्याचा विभागाचा निश्चय आहे. आरोग्य, संगीत, भाषा, साहित्य, स्थापत्य, तांत्रिक उपकरणी, कृषी, उर्जा व्यवस्थापन, पर्यावरण, खगोलशास्त्र अशा रोजच्या जगण्यापासून ते कल्पनेपलिकडच्या विश्वापर्यंत सर्वव्यापी असलेल्या अशा विज्ञानाचे भांडार विज्ञान प्रेमींपर्यंत पोचवणे आणि ह्या प्रक्रियेत आपणही अधिक सुजाण व व्यापक होणे हे विभागाचे ध्येय आहे. तरुण आणि उत्साही कार्यकर्त्यांची कुमक बांधण्याचे उद्दिष्टही ह्या प्रकारे साध्य करता येईल असाही विश्वास समितीला वाटतो.
विज्ञानाचे, तर्कबुद्धीचे मुख्य आश्रय स्थान असलेल्या डाव्या मेंदूला प्राधान्य देणारे चिन्ह विभागाचे बोधचिन्ह म्हणून ठरवण्यात आले.
आतापर्यंत यशस्वी रित्या पार पाडलेले उपक्रम / कार्यक्रम :
- दि. १२.०४.२०१४ विज्ञान कथावाचन आणि ह्या साहित्य प्रकारावर चर्चा
- दि. १७.०५.२०१४ “गणिताची वैज्ञानिक ओळख” ह्या विषयावर तज्ञांशी चर्चा (गणितातील मुलभूत संकल्पना आणि त्यानुसार विविध शाखांची उभारणी समजून घेण्याचा प्रयत्न)
- दि. १०.१०.२०१४ “मंगळयान” ह्या कार्यक्रमात भारताच्या दैदिप्यमान अवकाश झेपेविषयी अद्ययावत माहिती तीही मंगळ स्वारीमध्ये प्रत्यक्ष हातभार लावणाऱ्या व्यक्तींकडून.
- दि. २८.०२.२०१५ राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक प्रयोगांची, रोजच्या वापराच्या वस्तूंमधून, अनोखी स्पर्धा आणि त्या द्वारे उलगडून दाखवणारे प्रयोग.
- दि. २८.०३.२०१५ “गो स्मार्ट” हा अंतरजाल आणि सेलफोनचा प्रभावी वापर करण्यासाठी जनसामान्यांना मार्गदर्शन करणारा अतिशय उद्बोधक आणि रंजक कार्यक्रम
- दि. २५.०४.२०१५ “निवडक धनंजय विज्ञानकथा” ह्या राजेंद्र प्रकाशनच्या पुस्तकाचे प्रकाशन आणि डॉ. बाळ फोंडके ह्यांच्याशी विज्ञानप्रेमींसाठी मुक्त विज्ञानगप्पांचा कार्यक्रम
- दि. ०९.०५.२०१५ (प्रस्तावित) सौरउर्जेवर आधारित सेलफोन चार्जर बनवण्यासाठी कार्यशाळा. सहभागी व्यक्तीना स्वतःसाठी चार्जर बनवून घरी नेता येईल. त्याचबरोबर सौर उर्जेतील तज्ञ जनसामान्याना ह्या विषयाची भारतासंदर्भात एकूण प्रगती आणि भवितव्य ह्याची माहिती देतील.
- दि. २२.०७.२०१५ व्यवसाय मार्गदर्शन उपक्रम. मार्गदर्शक डॉ. सिद्धिविनायक बर्वे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना विज्ञानातील आणि विशेषतः संशोधनातील उपलब्ध करिअर पर्यायांविषयी मार्गदर्शन केले. उपस्थिती सुमारे ३५०.
- दि. १२.१२.२०१५ यंदाचे डॉ. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार विजेते डॉ. विदिता वैद्य आणि डॉ. मंदार देशमुख यांचा सत्कार डॉ. संजय देशमुख, कुलगुरू मुंबई विद्यापीठ, ह्यांच्या हस्ते करण्यात आला. दोघांनी आपापल्या क्षेत्रातील अद्ययावत संशोधनाविषयी प्रबोधन केले. नंतर श्रोत्यांनी अनेक प्रश्न विचारून शंका समाधान करून घेतले. अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम उत्तम रित्या संपन्न झाला.
- दि. २७.१२.२०१५ सापेक्षतावाद ह्या सिद्धांत मांडणीच्या शताब्दी वर्षानिमित्त ह्या विषयावर वर श्री. राजीव चिटणीस ह्यांचे उत्कृष्ट व्याख्यान झाले. हा क्लिष्ट विषय संपूर्णपणे मराठीत परंतु अतिशय ओघवत्या शैलीत आणि तळमळीने त्यांनी मांडला.
- दि. २०.०१.२०१६ गुरुत्व लहरी ह्या शंभर वर्षांपूर्वी मांडल्या गेलेल्या संकल्पनेची प्रत्यक्ष प्रचिती प्रयोगातून सिद्ध नुकतीच झाली. ही संकल्पना आणि लायगो ह्या विषयावर ग्रंथालय उपक्रम “वाचक संवाद” अंतर्गत कार्यक्रम आयोजित केला होता. वक्ते होते श्री. जेउरकर. त्यांनी केवळ छंद म्हणून अभ्यासपूर्वक हा विषय जोपासला आहे. अतिशय सोप्या भाषेत त्यांनी संपूर्ण मराठीत हा विषय मांडला.
- दि. २७.०२.२०१६ आणि २८.०२.२०१६ राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अंतर शालेय विज्ञान प्रश्न मंजुषेचा कार्यक्रम आयोजित केला होता. ह्या प्रश्न मंजुषेच्या कार्यक्रमामध्ये मुलुंड, भांडुप, ठाणे ह्याबरोबरच विरार, वांगणी अशा दूरच्या आणि ग्रामीण भागातील शाळांनीही भाग घेतला होता. सगळ्या विद्यार्थ्यांनी ह्या प्रश्न मंजुशेच्या कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला. चार फेऱ्यांमध्ये आयोजित केलेल्या ह्या दीर्घ स्पर्धा कार्यक्रमाच्या संपूर्ण आयोजनात विज्ञान विभागाच्या तरुण कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट घेतले आणि हे शिवधनुष्य हसत खेळत पेलले. सांघिक कामाचं हा अत्यंत उत्तम नमुना होता.
- दि. ०७.०५.२०१६ Robotics Level 1 कार्यशाळा आयोजित केली होती. वयोमर्यादा किमान१२ होती. १७ जणांचा सहभाग असलेल्या ह्या कार्यक्रमात आबालवृद्धांनी प्राथमिक स्वरूपाचा यंत्र मानव स्वतः बनवण्याचा आनंद घेतला. हा कार्यक्रमदेखील संपूर्णपणे तरुण कार्यकर्त्यांनी आखून यशस्वीपणे पार पाडला. Level 2 साठी पुरेशी नोंदणी झाल्यास ११ जूनला पुढील कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस आहे.
- दि. १२.०६.२०१६ Robotics Level 2 कार्यशाळा जिच्यात सहभागींकडून वायरलेस रोबो बनवून घेऊन तो वापरून काही स्पर्धात्मक खेळ घेण्यात आले
जुलै २०१६ करियर मार्गदर्शन कार्यशाळा (महाराष्ट टाईम्स च्या सहकार्याने): अभियांत्रिकी आणि वैद्यक क्षेत्राकरता तसेच इतर विविध क्षेत्रांकरता अशा दोन स्वतंत्र कार्यशाळा. - विनारोख व्यवहार कार्यशाळा: निश्चलनीकरणामुळे अचानक डिजिटल व्यवहार करण्याची गरज निर्माण झाली. ह्या विषयावर सामान्यांना प्रबोधनाची असलेली गरज लक्षात घेऊन अर्थ विभागाच्या मदतीने घेतलेल्या कार्यशाळेला भरघोस प्रतिसाद मिळाला.
- राष्ट्रीय विज्ञान दिवस : २४ आणि २६ फेब्रुवारी २०१७ रोजी- १९ शाळांचा सहभाग, विविध टप्प्यात घेतलेल्या स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांचा कस लागला, उत्तम प्रतिसाद मिळाला.
- ७ जुलै २०१८: अंटार्क्टिका हा दक्षिण ध्रुवावरचा गुढरम्य प्रदेश अलगद उलगडून दाखवणारा डॉ. मधुबाला जोशी चिंचाळकर ह्यांचा अदभूत कार्यक्रम
- २४ नोवेंबर २०१८ : जागतिक विज्ञान दिवस ( ८ नोवेंबर) युनेस्कोने पुढाकार घेऊन जाहीर केलेला हा दिवस विज्ञानाशी संबंधित अनेक विषयांवर वाद-विवाद आणि निबंध स्पर्धा ह्या स्वरुपात साजरा केला, मुलांचा सहभाग वाखाणण्याजोगा लाभला
- २ मार्च २०१९ : राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) – विमान कसं उडतं व त्याचं नियंत्रण कसं केलं जातं ह्या व अशा अनेक तांत्रिक गोष्टींचं मार्गदर्शन. शिवाय विद्यार्थ्यांना सिम्युलेटर वर विमान उडवण्याची संधी, तसेच रोख बक्षिसाने सन्मान. श्री. शशिकांत कोप्पीकर ह्या निवृत्त विंग कमांडर सरांनी हवाईदल व एकूणच संरक्षणदले व तेथील करियरच्या अतिशय अभिमानास्पद अशा संधींविषयी मोलाचं मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना विचारप्रवण केलं.
वर उल्लेखलेल्या कार्यक्रमांव्यतिरिक्त विज्ञानविभागाचे तरुण कार्यकर्ते आणि खास ह्या उद्देशाने जोडून घेतलेले प्रशिक्षणार्थी स्वयंसेवक अशा एकूण ८ जणांच्या चमूने वेबसाईटचे काम केले.
श्री सतीश पाटणकर (अध्यक्ष)
श्री नितीन देशपांडे (कार्यवाह)