ग्रंथालय

सा. स. न. चिं. केळकर ग्रंथालय ”अ” वर्ग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त ग्रंथालयाची ठळक वैशिष्ट्ये

अ.क्र. तपशील  
१. स्थापना १ मे १९७९
२. मुक्तद्वार १ मे १९७९ पासून
३. मान्यता १९८२
४. मोफत वृतपत्र वाचनालय १९८२
५. ज्ञानेश्वर पुस्तक पेढी १९८२
६. “ब” वर्ग १९८६
७. स्वतंत्र महिला व बालविभाग १९८६
८. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार १९९२
९. ग्रंथालय अधिवेशन १९९३
१०. “अ” वर्ग १९९७-१९९८
११. संगणकिकरण १९९९
१२. साहित्य साधना पुरस्कार २००६
१३. वाचक संवाद १२.०२.२००७
१४. प्रिय रसिक :- साहित्यिक गप्पा २००९
१५. राजहंस प्रकाशनतर्फे उत्कृष्ठ ग्रंथालय सन्मान – रु. १००००/- ची पुस्तके २०११-२०१२
१६. शतायू ग्रंथालय संमेलन २९ एप्रिल २०१२
१७. दृष्टीसेवा अभ्यासिका १६.०७.२०१२
१८. बारकोड २०१२-२०१३
१९. एकूण ग्रंथसंख्या ३४००० २०१४
२०. संदर्भ ग्रंथ विभाग – ५३५ ग्रंथ २०१३
२१. ग्रंथ विभाग – ११२ ग्रंथ २०१३

ग्रंथालय मनोगत

अनेक निस्वार्थी कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळेच महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय योजना अंतर्गत १९९२-१९९३ या वर्षीचा ‘ब’ वर्गातील ग्रंथालयासाठी असणारा राज्य पातळीवरील रु. १५,०००/-चा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे असलेला प्रथम पुरस्कार आपल्या ग्रंथालयास प्राप्त झाला.

आमची ठळक वैशिष्ट्ये

    1. सभासदांना “मुक्त द्वार” पद्धतीने पुस्तके उपलब्ध असल्याने पुस्तके स्वत: निवडण्याचा आनंद मिळवता येतो.
    2. साहित्याच्या प्रमुख प्रवाहापेक्षा वेगळ्या क्षेत्रामध्ये, विषयामध्ये ज्या साहित्यकृती निर्माण होतात त्यांची दखल घेतली जावी, त्या साहित्यकृतीकडे वाचकांचे लक्ष वेधावे या उद्देशाने ग्रंथालयाने “साहित्य साधना पुरस्कार” कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने २००६ पासून सुरु केला आहे. यावेळी मान्यवर लेखकांना आमंत्रित करून त्यांच्या विचारांचे आदान प्रदान करण्यात येते. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ग्रंथालयातर्फे आणखी एक उपक्रम राबविला जातो तो म्हणजे दिवाळी अंकातील साहित्याची नोंद केलेल्या उत्कृष्ट टिपणवही लिहिणाऱ्या वाचकांचे पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देऊन कौतुक केले जाते.
    3. आमच्या ग्रंथालयात दि. १२.०२.२००७ पासून भरघोस प्रतिसाद असलेला “वाचक संवाद” हा उत्तमोत्तम पुस्तकांवर चर्चा होणारा कार्यक्रम दर सोमवारी असतो. भावलेल्या साहित्याचे तसेच वृत्तपत्रीय लेख, मजकूर, स्फुटे ह्यांचे आदानप्रदान होते. प्रसंगी समीक्षा देखील होते. आतापर्यंत २५० भागाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम म्हणून श्री. राजाराम व्हनमाने (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुलुंड) यांचे व्याख्यान व वाचकांशी संवाद हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
    4. सभासदांना त्यांनी वाचलेल्या उत्कृष्ट पुस्तकांचे परीक्षण लिहून देण्यास प्रोत्साहन दिले जाते आणि ते परीक्षण इतर सभासदांना वाचण्यासाठी ग्रंथालयातील फलकावर लावले जाते.
अनु. पुरस्कार प्राप्त साहित्यिक वर्ष साहित्यकृती विषय प्रमुख पाहुणे
१. श्री. भारत सासणे २००५-२००६ शुभवर्तमान कथा डॉ. सुधा जोशी
२. श्री. गिरीश प्रभुणे २००६-२००७ पारधी भटके/विमुक्त विजय कुवळेकर
३. डॉ. संजय ओक २००७-२००८ अवनत होई माथा विज्ञान कुमार केतकर
४. श्री. सुमेध वडावाला २००८-२००९ मनश्री शब्दांकन भा.ल.महाबळ मुलाखत – शोभा नाखरे
५. डॉ. श्री. संजय ढोले २००९-२०१० प्रेमाचा रेणू विज्ञान कथा मोहन आपटे
६. श्री. गिरीश कुबेर २०१०-२०११ युध्द जीवांचे रिपोर्ताज अरुण साधु
७. आशा आपराद २०११-२०१२ भोगले जे दुःख त्याला उपेक्षितांचे हुंकार डॉ. उज्वला करंडे
८. डॉ. सदाशिव शिवदे २०१२-२०१३ ज्वलज्ज्वलनतेजस संभाजी राजा इतिहास डॉ. दाऊद दळवी
९. बाबू मोशाय -हेमंत २०१३-२०१४ बॉम्बे टोकीज सिनेपत्रकारिता विश्वास पाटील मुलाखत-अमोल
      1. राजहंस प्रकाशनातर्फे देण्यात येणारा महाराष्ट्रातील उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार २०११-१२ या वर्षाचा आपल्या ग्रंथालयाला देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप रु. १०,०००/- किमतीची पुस्तके ग्रंथभेट म्हणून मिळाली.
      2. सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ग्रंथालयाचे संगणकीकरण झालेले असून कोणतेही पुस्तक, लेखक, विषयवार माहिती तत्काळ उपलब्ध होते. ग्रंथालयाचे आर्थिक व्यवहारही संगणकाद्वारे तत्काळ केले जातात. तसेच ग्रंथ आणि मासिके यांचे “बारकोड” करण्यात आले आहे. यासाठी ग्रंथालयाचा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग कार्यरत आहे.
      3. ग्रंथालयातर्फे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी “ज्ञानेश्वर पुस्तक पेढी” हा उपक्रम १९८२ पासून राबविला जातो. इयत्ता ९ वी व इयत्ता १० वी च्या विद्यार्थांना शालेय पुस्तके विनामूल्य वापरासाठी पुरविली जातात. त्याचा प्रतिवर्षी सुमारे १५० ते २०० विद्यार्थी लाभ घेतात. तसेच कर्जत जवळील नांगुर्ले येथे आदिवासी पाड्यातील इयत्ता ९ वी व इयत्ता १० वी च्या विद्यार्थांना देखील शालेय पुस्तके देऊन हा उपक्रम राबविला जातो. दरवर्षी ४० विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.
      4. ग्रंथालयातर्फे वाचकांसाठी मोफत वाचनालय चालविले जाते. दररोज २७ ते ३० वृत्तपत्रे घेतली जतत. त्यात मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी वृत्तपत्रांचा समावेश आहे. त्याचा लाभ दररोज सुमारे १०० वाचक घेतात.
      5. ग्रंथालयाने पॉप्युलर प्रकाशन यांच्या सहकार्याने “प्रिय रसिक” हा साहित्य गप्पांचा ३ दिवसाचा कार्यक्रम सुरु केला आहे. ह्या अंतर्गत प्रथितयश लेखक, दिग्दर्शक, कवी, संगीतकार असे अनेक मान्यवर भेट देत असतात.
      6. ग्रंथालयातर्फे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. जसे, सेतुमाधवराव पगडी यांच्या दि. २७ ऑगस्ट रोजी स्मृतिदिनानिमित्त ‘‘स्मृतीव्याखानमाला” तसेच मुलुंडमधील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय ग.क.खांडेकर वाचनालय ग्रंथालय आणि आमचे न. चिं. केळकर ग्रंथालयातर्फे सातत्याने २५ वर्षे ‘‘वसंत व्याख्यानमाला” हा तीन दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्याचबरोबर हया तीन ग्रंथालयाच्या सहकार्याने सहलीचे आयोजनही केले जाते. तसेच दर मे महिन्यात ‘‘बालमैफल” या नावाचा उपक्रम सुरू केला आहे. याला बच्चेकंपनीची सुंदर दाद मिळते आणि पुस्तकांच्या जगात मुले हरवून जातात.
      7. ग्रंथालयातर्फे अनेक उत्तमोत्तम कार्यक्रमांची आखणी केली जाते. त्या निमित्ताने कार्यक्रमासाठी संस्थेत अनेक दिग्गज व्यक्तिंची उपस्थिती असते. अशा व्यक्तिंचे मार्गदर्शन व कौतुकाची थाप ग्रंथालयाला लाभते.
      8. ग्रंथालयात असलेल्या ग्रंथ आणि साहित्यिक व शैक्षणिक ग्रंथालयाबद्दलच्या वेबसाइटसचा लाभ आमचे सभासद आणि प्रामुख्याने विदयार्थी वर्ग घेत आहेत.
      9. आमचे ग्रंथालय आणि नॅशनल असोशिएशन फॉर ब्लाइंड (नॅब) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘‘दृष्टिसेवा अभ्यासिका” २०१२-२०१३ पासून आमच्या ग्रंथालयात सुरु केली आहे. लांब राहणाऱ्या व रेल्वेने प्रवास करणाऱ्या इयत्ता १०वी च्या दृष्टिबाधित विद्यार्थांना बहिस्थ पध्दतीने माध्यमिक परीक्षेला बसता यावे यासाठी मुलुंड हे मध्यवर्ती ठिकाण सोयीचे जावे. म्हणून हा उपक्रम राबविला जात आहे. सेवाभावी वृत्तीने काम करणारे आमचे सभासदही विद्यार्थ्यांना शिकविणे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आम्हांला मदत करीत आहेत. गेल्या वर्षीच्या दृष्टिबाधित विद्यार्थ्याचा अत्यंत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. ही आमच्या ग्रंथालयासाठी भूषणावह बाब आहे. यावर्षी २८ विदयार्थी याचा लाभ घेत आहेत.
      10. ‘‘अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान” इंदूर आणि न. चिं. केळकर ग्रंथालय हयांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ फेब्रुवारी २०१४ रोजी एक दिवसीय संमेलन पार पडले. हया श्रीमंत महाराणी अहिल्याबाई होळकर साहित्य संमेलनात अहिल्याबाईंच्या जीवनावरील तीन ग्रंथांचे प्रकाशन, त्यांच्यावरील साहित्यावर चर्चा, त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा आढावा अशा कार्यक्रमांचा समावेश होता.अतिशय दक्ष अशी ग्रंथालय समिती आणि सभासदांच्या हितासाठी मनापासून झटणारा कर्मचारी वर्ग यामुळे आमचे ग्रंथालय लोकाभिमुख झाले आहे.अभिरुचीसंपन्न वाचक आज आमच्याकडे बहुसंख्येने येत आहे. अर्थात सभासदांनी वेळोवेळी केलेल्या सूचना आणि तक्रारी यांचे योग्य निरसन व मूल्यमापन करुन त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न आमचे ग्रंथालय नेहमीच करीत असते.

श्रीमती नंदिनी हंबर्डे (अध्यक्ष)

श्री अरुण भंडारे (कार्यवाह)