आरोग्य

महाराष्ट्र सेवा संघाने केवळ सामाजिक जाणीवेतून आरोग्य विषयक कार्य मर्यादित स्वरुपात करण्याच्या उद्देशाने श्री. अनिरुद्ध ओक यांच्या बहुमोल सहकार्याने कर्जतच्या नांगुर्ले परिसरातील “श्री. अनंत श्रीधर ओक वनौषधी संशोधन व संवर्धन प्रतिष्ठानच्या” वास्तूत सन २००३-०४ पासून सुरु केले व त्याचा विस्तार जवळपासच्या ८५ आदिवासी पाड्यामधून झाला.

तेथील जीवनमान हे बहुतांशी दारिद्र्य रेषेखाली असल्यामुळे सामाजिक बांधिलकीने सेवा संघाने आपले कार्यक्षेत्र निश्चित केले आहे. वर्षभरातून तेथील कुपोषित व गरजू व्यक्तींसाठी आरोग्य शिबिरे भरवण्यात येतात.

संबंधित विभागातील आरोग्याच्या समस्यांचा अभ्यास करून वेगवेगळ्या आरोग्य विषयांवर वार्षिक शिबिरे आयोजित करताना स्थानिक जनता व पुढारी यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद, विविधांगी उत्साहवर्धक अनुभव व त्यामुळे प्रगल्भ जाणीवा तसेच विस्तारणारे कार्यक्षेत्र या सर्वांची परिणीती म्हणजेच २००५-०६ मध्ये आरोग्य विषयक कार्याला वाहिलेल्या स्वतंत्र अशा आरोग्य विभागाची स्थापना सेवा संघात झाली.

नांगुर्ले परिसरातील गरीब आदिवासी व्यक्तीस नियमित औषोधोपचार मिळण्याची व्यवस्था, डॉ. घुमे व डॉ. दीक्षित यांच्या सहभागाने सुरु झाली. डॉ घुमे यांच्या पुढाकाराने तेथील ८५ आदिवासी पाड्यात प्रत्येकी एक “आरोग्य रक्षक” नेमून त्यांच्याद्वारे प्रथमोपचार व तातडीच्या आरोग्यसेवा पुरविल्या जातात. त्या निमित्ताने आरोग्य रक्षकांना प्रशिक्षित करणे, प्रत्यक्ष जागेवर कार्यानुभव देणे, त्यांच्यातील सेवाभावी वृत्ती सदैव जागृत ठेवणे व त्यास प्रोत्साहन देणे यावर भर दिला जातो. यासाठी डॉ घुमे यांनी या केंद्राचा केलेला प्रचार व साधलेल प्रचंड जनसंपर्क उदंड प्रतिसादाने कामास आला आहे.

महाराष्ट्र सेवा संघाच्या अमृत महोत्सवानिमित्त २००९-१० साली या आदिवासी भागातील ७८ विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया मुलुंडचे डॉ. पद्मश्री विकास महात्मे यांच्या सहकार्याने करण्याचे उद्दिष्ट ठरवून सेवासंघा बरोबर संस्थेच्या उदार आर्थिक धोरणाने ७८ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत.

बॉम्बे हॉस्पिटलची एक सहयोगी संस्था, बॉम्बे मेडिकल फौडेशन च्या मुलुंड (पश्चिम) दवाखान्याची दैनंदिन व्यवस्थापानाची जबाबदारी जून २०११ पासून आमच्या आरोग्य विभागाकडे आहे.

सप्टेंबर २०१४ मध्ये आरोग्य भारती ह्या संस्थेच्या सहकार्याने एक पूर्ण दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती ज्यात अनेक नामवंताचा सहभाग होता व त्याला मुलुंडकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.

एकीकडे सेवा संघाच्या या कार्यामुळे संबधित गरजू व्यक्तींची जगण्याची उमेद वाढीस लागली आहे व दुसरीकडे त्यातून आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना हे कार्य करताना मिळणाऱ्या समाधानाने, आमच्याच वयाप्रमाणे व परिस्थितीनुसार असह्य होणाऱ्या ताण तणावाचा आम्हांला विसर पडू लागला आहे. आपल्या सद्भावना व्यक्त करण्याचा सोपा मार्ग म्हणजे “आरोग्य सेवा” होय. या कार्यात स्वेच्छेने सहभागी झालेल्या अनेक अनोळखी व्यक्तींनी एकमेकांशी नाती जोडण्याची आम्हाला संधी दिली. त्यामुळे लोकांच्या मनातील सद्भावना, आरोग्य सेवेने कृतीत उतरवल्यानंतर आपल्या सभोवतालच्या जगात, समाजात खूप फरक पडू शकतो हे आम्हांला जाणवले.

सप्टेंबर २०१३ मध्ये सदर दवाखान्याचे संपूर्णतया अद्ययावत मशीनसह “फिजीयो थेरपी सेंटर” सुरु करण्यात आले. त्यासाठी ‘बॉम्बे मेडिकल फंड फार्मेशन’ ने आर्थिक सहाय्य केले.

सभोवतालच्या सोसायट्या व इतर परिसरातून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. तेथे जनतेच्या सेवेसाठी सकाळ-संध्याकाळ दोन डॉक्टर्स, एक फ़िजिओ थेरेपिस्ट व एक नर्स-कम-कंपाउंडर यांना संस्थेने नेमले आहे. तेथे “वाजवी दरात” सर्व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ते आठवड्याचे ६ दिवस गरजू व्यक्तींना हसतमुखाने सेवा देत असतात.

श्री रमेश धामणकर (अध्यक्ष)

श्री विनायक जोगळेकर(कार्यवाह)